आज बरेच दिवसांनी
ती परत माझ्याकडेच आली
बघितले जरा नीट तर
ओळखीचीही वाटली
थोडे आठवून पाहिल्यावर
मग खूण पटली
तरी पण आज ती मला
थोडीशी वेगळीच वाटली

आता अगदी समोरच होती
म्हणून मी तिला विचारले
गेल्या कित्येक दिवसांत तुला
आसपासही नाही पाहिले
आज अचानक पुन्हा तुला
मी कसा आठवलो
प्रश्न विचारत असताना तिला
मीच हुंदके देऊ लागलो


ती म्हणाली हळूच 
असे तुझे रडणे वाटे शाप
तुझ्या अश्रुत दिसतो मला 
लेकीची पाठवणी करणारा बाप
दूर गेले तरी
मनातुन तुझीच होते नेहमी
तुला भेटेन पुन्हा नक्की 
ह्या विचारातच जगत होते मी


तिचे बोलणे ऐकून मी मग
खोटेच जरासे हसलो
तिच्याकडे न बघताच
शून्यात नजर लावून बसलो
तसेच तिला पुढे विचारले
काय घडले सांग मला
बाप म्हणाली आहेसच तर
तुझी खुशालिही कळूदे मला


ती म्हणाली
फेसबुक, व्हाट्सऍपच्या जगात
तू एकटच मला सोडलं
लाईक्स आणि कंमेंटसच्या पावसात
बरंच काही घडलं
काहींना मी आवडले
काही माझ्या प्रेमात पडले
काहिंना काहीही समजत नसताना
उगीच येऊन भिडले


कुणी मला जवळ केले
कुणी मला झिडकारले
कुणी हवे तसे मला बदलून
पुढे स्वतःचे नावही जोडले
तुझीच कन्या तुझ्यासारखी
आहे अशी विरक्त म्हणून
काहीच त्रागा केला नाही
एवढे सगळे घडून…


मी म्हणालो माझे पोरी
जमले जर तुला
विनंती करतो अदबीने
माफ कर मला
गेल्या काही दिवसांत
बघितले नाही तुझ्याकडे वळून
तेव्हढ्यामध्ये तुझ्यासोबत
काय काय गेले घडून

ती म्हणाली जाऊदे
विषय वाढेल व्यर्थ
आजूबाजूचे ऐकणारे सर्व
काढतायत भलतेच अर्थ
आता तरी सांग त्यांना
काय आपण बोलतोय
तू माझ्यासाठी असा
का आतल्या आत रडतोय


मी म्हटले सांगतोच सगळे
कळुदेत सगळे सगळ्यांना
तुझ्या माझ्या नात्यातला
हा हळवेपणा कशाला
अजूनही नाही का कळले
ही आहे कोणाची कथा??
आज पुन्हा मांडली मी
फेसबुक वर पोस्ट केलेल्या
माझ्या कवितेची व्यथा।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *