तृप्ती

तुझ्या हळूवार स्पर्षाने मला जाग आली. खरं  तर हे रोजचेच होते त्यात नवीन असे काहीच आता उरले नव्हते. अगदी दररोज हेच घडत असे ज्या दिवसापासून मी तुला पाहिले अगदी त्या दिवसापासून हे असेच घडते. तसा मी काही लवकर उठणार्‍यांपैकी नाहिच! पण आज पुन्हा तुझ्या त्या रेशमी स्पर्शाने झोपेतून जागे केले, खरे तर वास्तवात आणले.

रोजचेच तुझे ते स्वप्नांत येणे, माझ्याशी बोलणे, हसणे-रुसणे, रागावणे समजावणे….मला एका सोनेरी जगात घेउन जाते. स्वर्गच म्हण हवं तर! तिथे उन्हाचा दाह नसतो, प्रकाश मात्र लख्ख असतो; बोचरे वारे नसतात पण थंड, मनाला शीतलता देणारी शांत हवेची झुळूक असते, खोल भयाण किनारे नसतात तर मंद गतीने वाहणारे प्रवाह असतात. सगळच कसं आल्हाददायक, सुंदर! आणि अशातच तू स्पर्श करण्यासाठी, हात हातात घेण्यासाठी तुझा हात पुढे करतेस आणि…आणि तुझ्या त्या स्पर्शाने मी अचानक रोमांचित होतो. ते रोमांचित क्षण इतके उत्कट आणि प्रबळ असतात की…की क्षणार्धात जाग येते, आणखी काय? मी जागा होतो….वास्त्वात परत येतो!

आजही तेच झाले, पण आज तू स्पर्श करण्याची जरा जास्तच घाई केलीस; आत्ताच तर कुठे तू आली होतीस…आणि बघतो तर सकाळचे अहं पहाटेचे चार वाजले होते! वार…हं आज रविवार सुट्टीचा दिवस. पण जाउ दे, आता पुन्हा झोप येत नव्हती….उठलो….कामानिमित्त ह्या असल्या ठिकाणी एकटाच रहात असल्याने घरी कोणी झोपलेले असण्याचा, त्यांची झोपमोड होण्याचा काही प्रश्न नव्ह्ता.

सकाळची सगळी कामे आटोपून बसलो होतो. खर तर इतर दिवशी इतकी घाई होते की ते घड्याळाचे काटे घट्ट पकडून ठेवावेसे वाटतात, पण आज बघतो तर अजून पावणे पाचच वाजले होते. दिवस पावसाळी असल्याने आणि फार पहटेची वेळ असल्याने घरात आणि बहुधा बाहेरही….म्ह्णजे मी खिडक्याही उघडल्या नव्हत्या? पुढे होऊन ती दोन तावदाने सरकवली तत्क्षणी थंडगार हवेची झुळुक चेहर्‍याला स्पर्श करुन गेली, तुझा पदरच जणू!
बाहेरही अंधारच होता.

सुट्टी असल्याने बाहेर जाउन एक फेरी मारुन येण्याचे ठरले, तयारी झाली, घड्याळ बरोबर पाच वाजल्याचे दाखवत होते. मी बाहेर पडलो….रस्त्यावर माणसे नव्ह्ती, जे गाव धरणाच्या कामासाठी वसवले होते ते अद्याप जागे झाले नव्ह्ते. मधुनच एखादा ट्रक खडी-रेती वगैरे घेऊन किंवा सकाळच्या पाळीतील कामगारांना घेऊन धरणाच्या दिशेला जात होता. आज मला सुट्टी असली तरी इतर काही लोकांना काम करावे लागणार होते. मी माझ्याच आनंदात होतो, कारण इतरांना सुट्टी नव्हती ना!

बराच वेळ शांतता होती, मी सरळ रस्त्याने शहराच्या दिशेने चालायचे ठरवले. आज फक्त स्वतःचा विचार करायचा हा विचार करायचा हा विचार पक्का केला आणि पाय उचलला. चालण्याचा वेगही तसा मंदच होता. कंटाळा आला की धरणाकडे जाणार्‍या एखाद्या ट्रक मधून पुन्हा आपल्या घराकडे, छे! घर कसलं एक खोलीच ती! रहातो कोण? मी एकटाच. तसे आमच्यातील सगळेच एकटे रहात होते. परत घराकडे निघावे असा माझा विचार होता. अभियंता असल्याने तेवढी मुभा मला होती. आजूबाजूला पहात हळूवार पाऊले टाकत निघालो….

वातावरण ढगाळ होते. एक अजब प्रकारचा ओलावा त्यात भरुन राहिला होता, तुझ्या डोळ्यांत दिसतो ना अगदी तसाच! पाण्याने ओथंबलेले ते ढग एकाही थेंबाची बरसात करत नव्हते ते फक्त माझ्याकडे बघत होते; तसेच पाणावलेल्या डोळ्यांनी, ओथंबलेल्या हृदयानी….मला तुझी आठवण आली. तुझे पाणावलेले डोळेही नेहमीच असे भावनांनी भरलेले असतात, तुझे हृदयही असेच ओथंबलेले असते. पण ज्या प्रमाणे ते ढग आज पाणी बरसत नव्हते त्याच प्रमाणे तुझे ओठही हृदयीच्या भावना शब्दरुपाने बरसू शकत नव्हते…
अहंहं…आज मी फक्त माझा आणि माझाच विचार करायचे ठरवले होते, तू कशी काय आठवलीस?

तसाच पुढे निघालो हा रस्ता भर डोंगरात असल्याने भलताच नागमोडी होता. समोर एक उंच डोंगर दिसत होता, हिरवा रंग धारण करुन तो आकाशाला भिडण्याचा प्रयत्न करीत होता त्याची ती महत्वाकंक्षा पाहून मला पुन्हा तू आठवलीस, तुझेही तसेच….उंच-उत्तुंग विहार करण्याची, आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्ने पहाण्याची आणि ती गाठण्यासाठी धडपडायचे.
पुन्हा तुच!

मी तुला मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करीत होतो पण हा निसर्ग त्याच्या प्रत्येक कृतीतून मला तुझी आठवण करुन देत होता. मंद वार्‍याने होणारी ती पानांची हालचाल आणि त्यातून निर्माण होणारा तो आवाज, जणू तू कानात हळूच काहितरी सांगते आहेस. उगवत्या सूर्याचा तो रक्तवर्ण तेजस्वी प्रकाश, जणू काही तू माझे आयुष्य उजळ केलेस. पक्ष्यांचा तो किलबिलाट, जणू काही तू मला जवळ बोलावते आहेस.आणि हा पाऊस! हो तो ही आलाच. चिंब केलेस तू मला असंख्य थेंबांनी, प्रेमाच्या थेंबांनी! तुझ्या प्रेमाची ही बरसात….मी प्रत्येक क्षण मनापासून जगलो आज. रोजच्या कामाचा क्षीण, थकवा, सगळे विचार, सगळे संपले! अनेक वर्षांनी ह्या जीवाने एक सुट्टी मनसोक्त अनुभवली. प्रत्येक माणसाला आयुष्यात हवी असते ती तृप्ती, पूर्णपणाची भावना अनुभवली, आणि ती ही फक्त तुझ्यामुळेच!

4 thoughts on “तृप्ती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *