…कधितरी मी नसेन पण तुला माझी आठवण येइल, माझ्या आठवणींनी जीव व्याकूळ होईल, बाहेर वाजणार्या पावलांची चाहूल तुला माझ्या येण्याची ओढ लाविल…..पण नाही….मी नसेन तिथे!
कधितरी मी फार दूर असेन तुझ्यापासून, जे काही माझे ते आपले आणि तुझे ते तुझेच म्हणणार्या तुला तेव्हा जाणवेल की आपण किती अपूर्ण आहोत, तुला ती अपूर्णता वेड लाविल पण सांभाळ स्वतःला….कारण ह्या वेळी मी नसेन तुला सांभाळायला….
कधितरी मी तुला भेटणार नाही, तू माझी वाट पाहून थकशील, क्षणभर तुला वाटेल “अरे हा गम्मत तर करित नाही?” पण नाही ही गम्मत नाही, आणखी थोड्या वेळाने तुला वाटेल की याने आपल्याला फसविले तर नाही? पण ही मी केलेली फसवणूक नाही, हे नियतीने मांडलेले सत्य असेल, ते जाणून घे उगीच भरकटू नकोस….कारण मी नसेन तुला सावरायला….
कधितरी अशाच सायंकाळी तुझे डोळे पाणावतील….सोबत घालवलेले ते क्षण तुझ्या डोळ्यांपुढे धावतील पण त्या ओघळत्या आसवांमधून तुला त्या क्षणांतील आनंद दिसणार नाही दिसतील त्या फक्त ओथंबलेल्या भावना! ज्यांच्यापुढे तुझे काहिच चालणार नाही पण थांब; ते अश्रु तू वाया घालवू नकोस, तुला स्वतःला त्यांची किंमत माहित नाही.
अगं वेडे तुझ्या आसवांची किंमत इतकी आहे की मी त्यांवर असे लाख जन्म ओवाळून टाकायला तयार आहे….पण तुझी आसवे थांबणार नाहीत कारण….मी नसेन तेथे ती पुसायला…..
असाच एका रात्री तुला मी दिसेन स्वप्नात! तुला आठवतील पुन्हा ते दिवस, त्या ओल्या भावना आणि ते आनंदी क्षण! तू हळूच हसशील माझ्याकडे पाहून लाजशील, माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करशील पण….पण अचानक तुला जाग येइल पुन्हा तो सुर्य तूला वास्तवात नेइल, तुला आधाराची गरज भासेल पण….पण इथे तिथे पाहू नकोस मी तिथे असणार नाही….
अगं वेडे रडतेस कशाला? मी नसलो म्हणून काय झाले? अगं तू म्हणायचीस ‘जे काही तुझं आहे ते आपलं आहे आणि जे काही माझं ते फक्त माझंचं आहे’ आणि मी ही ते मान्य करायचो पण आता खरं सांगायला हरकत नाही, ते तसं नव्हतचं कधी! जे काही माझं होतं त्यातली सर्व सुखं, आनंद आपला होता आणि जे काही तुझं होतं त्यातलही बरचसं मी तुला न सांगता घेतलं होतं, जे काही तुझं होतं त्यातलं सर्व दु:ख मी माझ्याकडे घेतलं….मला सवय आहे दु:खासोबत जगायची….
मी नसलो म्हणून काय झालं? तुझी दु:ख घेऊन मी दूर चाललो आहे….माझा आनंद मी तुला दिला आहे….तेव्हा नेहमी आनंदी रहा, सुखात रहा…मी नसलो म्हणून काय झालं?