आशीर्वाद

ज्याच्या भेटिसाठी लोक आपले उभे आयुष्य पणाला लावतात, उमेदिची सगळी वर्षे घनघोर अरण्यात जीवघेणी तपश्चर्या करण्यात घालवतात, फक्त मृत्युनंतरच त्याची भेट होते ह्या वेड्या विचाराने ऐन तारुण्यातच आत्मह्त्या करण्यास प्रवृत्त होतात असा तो ‘देव’ मला फार लहानपणीच भेटला!

भेटलेल्या प्रत्येकाला काहि-ना-काहितरी वर देउन आपले देवपण सिद्ध करणार्‍या त्या देवाने हो प्रत्यक्ष देवाने मलाही काहितरी मागण्यास सांगितले. मी ही माणूसच असल्याने ‘तुझ्या दर्शनाने धन्य झालो, आता ह्या क्षणी तुक्ष्या चरणी मोक्ष लाभू दे’ अशी संतांच्या तोंडी शोभणारी वाक्ये न करता सरळ मला जिंकण्याची शक्ती दे, सर्वकाही जिंकण्याची शक्ती! असा साधाच पण विचित्र वर मागितला. त्यानेही तथास्तु म्हणण्या अगोदर ‘हे सोपे नाही, फार सोसावे लागेल’ अशी पूर्वसुचना दिली. पण मी माझा हेका सोडायला तयार नाही हे पाहून तथास्तु म्ह्टले आणि ‘पुन्हा भेटेन’ असे सांगून तो अंतर्धान पावला.

आयुष्य वाईट चालले होते असे नाही. पण चांगलेही चालले नव्हते, देवाने वर दिला जिंकण्याचा अन् त्यासाठी लागणारी शक्ती माझ्यापाशी असावी म्हणून क्षणाक्षणाला तो मला हरवण्याचा प्रयत्न करित होता. मी ही अगदि जीवाच्या आकांताने ते प्रयत्न हाणून पाडत होतो. मिळणारा प्रत्येक विजय माझी ताकत वाढवत होता, अधिक काहितरी जिंकण्याची भूक वाढवत होता! तर हरण्याचा प्रत्येक प्रसंग मला जिंकण्यासाठी काय करावे लागतं आणि हरु नये म्हणून काय करावे ते शिकवत होता….

दोन अडिच वर्षांपूर्वी तोच देव त्याच वेशात, त्याच तेजाने माझ्यासमोर प्रकटला. मी ही विनम्र अभिवादन केले. तो म्हणाला “तू आजवर सामर्थ्यवान होण्यासाठी अनेक त्रास घेतलेस, असंख्य वेळा हार पचवलीस तरी पुन्हा हिरहिरिने उभा राहून प्रसंगाला सामोरा गेलास, जिंकलास! आणि इतके बिकट प्रसंग समोर येउनही तू मला कधिच दोष दिला नाहिस, उलट प्रत्येक वेळी तू माझे आभारच मानत राहिलास, यासाठीच मी पुन्हा तुला भेटायला आलो आहे. तू म्हणशील तर मी तुझी सगळी दु:खं दूर करायला तयार आहे आणि ती देखिल तू आजपर्यंत मिळवलेली सर्व ताकत तशीच ठेवून!” मी पुन्हा देवाला वंदन केले आणि नम्रपणे म्हणालो,”देवा, हे सत्य आहे की मी मागितलेली ताकत तुम्ही मला दिलीत. परंतु आजही मी जेव्हा आजुबाजुला बघतो तेव्हा मला माझ्यापेक्षाही सामर्थ्यवान माणसे दिसतात तेव्हा जर आपणाला मला काही द्यायचे असेल तर मला आणखी ताकत द्या आजवर मी फक्त दुसर्‍यांवर विजय मिळवण्याची ताकत कमावली ह्यापुढे मला आता स्वतःला जिंकयाची ताकत द्या.” देवाने मला पुन्हा समलावले,” हे त्याहून कठिण आहे कारण ह्यासाठी तुला आधिपेक्षाही भयंकर प्रसंगाचा सामना करावा लागेल. फार जास्त त्रासदायक असेल ही गोष्ट!” पण मी ऐकायलाच तयार नव्हतो , देव म्हणाला “ठिक आहे, पण ह्यासाठी तुला जन्मभर युद्ध करावे लागेल, प्रत्येक क्षणी! युद्ध हरलास तरी पुन्हा उभे रहावे लागेल जिंकण्यासाठीच! तुझा प्रत्येक विजय तुला स्वर्गीय आनंद देईल पण….प्रत्येक विजय तुला पुढच्या युद्धाकडे नेईल! यातुन सुटकेचा एकच मार्ग्….स्वता:चा स्वता:वरचा अंतिम विजय! तेव्हा पुन्हा विचार कर.” मी म्ह्टले विचार झाला, मला तेच हवे आहे. “तू फारच जिद्दी आहेस पण असामन्यही आहेस, आपली ताकत योग्य कामासाठी वापरण्याची तुला जाण आहे आणि म्हणूनच मी तुला हा वर देतो, पण काहिही झाले तरी तू माणूस आहेस म्ह्णून पुढच्या प्रत्येक युद्धात तुला अधिक सामर्थ्यवान बनविण्यासाठी मी तुला जास्तीचे दोन हात देतो. तुझ्या दोन हातांच्या जोडीने ते ही काम करतील, तुला अधिक शक्तीशाली करतील.” असे म्हणून देव अंतर्धान पावला आणि माझा त्या दोन हातांचा शोध चालू झाला…

शिक्षणाने विज्ञान शाखेचा विद्यार्थी असल्याने ते दोन हात ही कोणती यांत्रिक वस्तु असावी असा अन्वयार्थ लावून मी शोध घेतला. परंतु असे काही असणार नाही अशी मनाची ठाम समजूत झाल्यानंतर मी तो विचार मनातून काढून टाकला.

येणार्‍या प्रत्येकात मी ते दोन हात शोधले. नातेवाईकांत, मित्रांमधे, एखाद्या कामगारात, प्रत्येक माणसात! कारण ते दोन हात म्हणजे एक पुर्ण माणूस ह्याची आता मला खात्री पटली होती…प्रत्येक माणसात मी तो माणूस शोधला आणि प्रत्येक हातात ते हात! पण मला त्यांचा शोध लागला नाही की देवाच्या त्या बोलण्याचा अर्थ!

पण्…पण जेव्हा मी तुला पाहिलं…हो अगदी पहिल्यांदाच तुझ्या त्या नाजूक हातांकडे पाहिलं त्याच क्षणी मला वाटलं की हेच ते दोन हात आणि हिच ती व्यक्ती!
त्यानंतर बर्‍याच गोष्टी घडल्या …तुझं अन् माझं एकत्र येण, भेटणं त्याहिपेक्षा एकमेकांवर प्रेम करणं….

पण जेव्हा मी पहिल्यांदा तुझ्या त्या नाजूक, कोमल हातांना स्पर्श केला आणि…..आणि मी प्रचंड धास्तावलो, मला देवाचा प्रचंड राग आला. त्याने मला ताकत देण्यासाठी असंख्य संकटे दिली तरी मला त्याचा कधिच राग आला नव्ह्ता पण आज मात्र मी त्या देवावर प्रचंड रागवलो….

मला ताकत मिळावी म्हणून त्याने एवढे नाजून हात, इतकी सुंदर व्यक्ती खर्ची घालावी? हे हात मेहेंदिने सजवण्यासाठी असतात, युद्ध करण्यासाठी नव्हेत हे काय ह्या विधात्याला मी सांगावं? तुझं सर्वांग मी एकदा न्याहाळल आणि तत्क्षणी देवाल्या असंख्य लाखोल्या वाहिल्या. मला ही ताकत नको पण ह्या सुंदरीचे असे हाल माझ्यामुळे नकोत असे मी त्याला मनोमन बजावले….

दुसर्‍याच दिवशी देव पुन्हा मला भेटला. खरं तर ही आमची तीसरी भेट, आज मी त्याला फार वाईट बोललो तरी तो शांतच होता…अगदि स्थितप्रज्ञ! त्याच्या तेजाने मी झाकोळून गेलो होतो तरी रागातच त्याला म्हणालो,” अरे जर मला सामर्थ्यच द्यायचे होते तर दोन पोलादी हात द्यायचे होतेस माझ्या हातांसारेखेच मर्दानी हात द्यायचे होतेस, हे अत्यंत सुकोमल नाजुक हात काय कर्तृत्व दाखवणार? हे तर एका स्त्रीचे हात आहेत आणि माझ्या शक्तीसाठी, माझ्या विजयासाठी मी एका स्त्रीचे सुंदर नाजूक हात युद्धात खर्ची घालू इच्छित नाही.” माझ्या ह्या रागावण्याने जराही विचलीत न होता देव उद्गारला,” तुला कोणी सांगितले की तिचे हात तुला युद्धात मदत करणार आहेत? त्यांच्या मदतीचा अर्थच तुला कळला नाही!
मी सांगतो, ते दोन नाजूक हातच नाहित तर ती एक पूर्ण स्त्री तुझ्या आयुष्यात तुझी कायमची जोडीदार बनणार आहे, तिचे ते हात नाजूक आहेत पण ते अत्यंत शक्तीशाली आहेत कारण त्यांच्यामागे एका स्त्रीचे मन आहे आणि हो, ते तुला लढायला मदत करणार म्ह्णजे त्या हातांत तलवार असेल किंवा ती असायला हवी हा तुझा विचारच चूकीचा आहे. तुला सामर्थ्य हवय तर तुझ्या लढाया तुला स्वतःलाच लढायला लागणार! तिचे ते दोन हात तुला नेहमीच सावरायला असतील, कधी चुकिच्या मार्गाने गेलास तर योग्य मार्गाकडे न्यायला असतील, कधी वाट सापडत नसेल तर पुन्हा योग्य वाट दाखवायला असतील, कधी थकलास तर मायेने गोंजारायला असतील, कधी जिंकलास तर प्रेमानं मिठीत घ्यायला असतील! आणि एक लक्षात ठेव त्या हातांना होणतीही अपेक्षा नसेल! असली तर एकच -फक्त तुझा विजय! ते तिचे हात नाहित ते माझेच हात आहेत अस समज. ते हात म्हणजेच ती स्त्री आयुष्यभर तुला साथ देईल!”

देवाच्या बोलण्याने मी गांगरुन गेलो, तुझं ते माझ्या आयुष्यात येणं हा प्रत्यक्ष देवाने योजलेला खेळ आहे हे मी जाणलं.
तुझ्या त्या नाजूक हातांनी बरेचदा मला सावरलं आणि यापुढेही  ते अशीच माझी मदत करत रहाणार याचं मला आश्चर्य वाटलं आणि त्या आश्चर्याच्या भरातच मी तुला मिठीत घेतलं…तुक्ष्या शरीराच्या त्या स्पर्शानं मन पुन्हा एकदा ताजंतवानं झालं….तुझ्या हातांच्या त्या नाजूक स्पर्शाने पुन्हा एकदा एक नवीन युद्ध जिंकण्याचं सामर्थ्य मला दिलं!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *