जसजसे आयुष्य सरत जाते, तसतसे लहानपणी पडणारे अनेक प्रश्न उलगडत जातात. आयुष्यातल्या अनेक अनुत्तरीत प्रश्नांवर अनुभवाचा प्रकाश पडतो आणि त्यातून त्या अनुत्तरीत प्रश्नांच्या उत्तरंचे परावर्तीत किरण डोळे दिपवू लागतात, मेंदूवर ताण पडतो, आकलन कक्षा रुंदावत जातात आणि माणूस प्रगल्भ बनत जातो.
आयुष्य पुढे सरतच रहाते कारण काळ हा थांबत नसतो आणि काळासोबत पुढे चालण्यातच फायदा असतो.
अचानक आयुष्यात चित्र-विचित्र घटना घडतात, ना-ना विविध बरी-वाईट वळणे येतात आणि सुख-दु:खाचे प्रसंगी कोमल किंवा वज्राघात होतात. त्या अनुभवातून तावूनसुलाखून निघालेला, अनेक अनुभवांनी युक्त झालेला तरूण आता विविध स्वप्ने पाहू लागतो……
आयुष्याची स्वप्ने….जीवनाची स्वप्ने…..सुखाची स्वप्ने!
नेमक्या याच वयात त्याची ओळख ‘प्रेम’ या शब्दाशी, नव्हे भावनेशी होते. या परिपूर्ण शब्दाचे त्याला आकलन होऊ लागते. ‘प्रेम’ या शब्दातील वैश्विक भावना त्याचे हृदय चिंब करु लागते….अशातच एखाद्या जन्म-जन्मांतरीच्या जीवलगाशी त्याची गाठ पडते….साता जन्मांचा साथीदार लाभतो आणि आयुष्याची स्वप्ने पहाणारा तरूण स्थिर होतो.
या स्थिर आयुष्यातून पुढे जाण्याची कोणालाही घाई नसते परंतु, आयुष्य पुढे सरतच असते….स्थिर आयुष्याची वर्षे संपतात्….एव्हाना डोक्यावरील केस पांढरे होऊ लागतात. आयुष्य पुढे सरतच असते आणि….आणि एक क्षण असा येतो की जेथे माणसाला आयुष्यभर केलेल्या कष्टंचा, आयुष्यभर भोगलेल्या यातनांचा वीट येऊ लागतो. आयुष्यभर अनेक वादळे सहजपणे पेलणार्या त्या धमन्यांना पुन्हा वादळे पेलण्याचा कंटाळा येऊ लागतो. म्हणा तशी ताकत सुद्धा त्यांच्यात उरलेली नसते!
आता त्या माणसाला शांततेची, एकांताची नितांत गरज भासू लागते….आयुष्यातील बर्या-वाईट अनुभवांची, घटनांची गोळाबेरीज करण्यासाठी!
ह्या अथक परिश्रमपूर्ण जीवनातून मिळालेल्या फायद्यांची आणि झालेल्या तोट्यांची, सुखाची किंवा दु:खाची गोळाबेरीज करत असतांनाच मन पुन्हा एकदा लहनपणात शिरते, पुन्हा अनंत प्रश्न डोळ्यासमोर उभे रहातात; पण या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लागणारी शक्ती किंवा तशी जिज्ञासा आता या माणसात उरलेली नसते.
अशाच प्रश्नचिन्हांच्या सानिद्ध्यात मानवी मन शेवटच्या घटिका मोजू लागते. या प्रश्नचिन्हांतून सुटका मिळविण्याचा प्रयत्न करू लागते. अनुत्तरीत प्रश्नांना, त्या प्रश्नचिन्हांना डोळ्यासमोरून दूर करून अखंड शांततेसाठी प्रार्थना करू लागते….मृत्युची आराधना!
अशातच एखादे क्षणी साक्षात मृत्यु झेपावत येतो आणि अनुत्तरीत प्रश्नांच्या अथांग सागरातून माणसाची मुक्तता करतो.
यानंतर रहातात त्या फक्त आठवणी….त्या व्यक्तीला जीवनाचा इतका कंटाळा यावा? असे त्याच्या जीवनात काय असावे? असे पुन्हा अनंत अनुत्तरीत प्रश्न!
त्या व्यक्तीसोबतच इतर अनेकांनी मरणाची प्रार्थना करून मृत्युरूपी आर्शीवाद मागावा असे का? देवाने जन्माला घातले ते मरण्यासाठीच अशी शून्यात्मक भावना….आणि त्यातूनच स्फुरलेला हा एक लेख!
Prasnna gr8 work u have done
kharacha yalach ayushya mhantat