…चंद्र निरखून पाहिला आहेस का कधी? तिने लाडात येऊन हळूच त्याच्या खांद्यावर डोके टेकत विचारलं.
पाहिला आहे की जेवढा इथून दिसतो तेवढा तरी नक्कीच पाहिला आहे, अगदी चांगल्या telescope ने पाहिला आहे. खड्डे सुद्धा मोजून दाखवू शकतो इतका स्पष्ट पाहिला आहे…
झालं तुझं वैज्ञानिक प्रवचन सुरू.
राहू दे; मी तसे नव्हते म्हणत रे…
तो चंद्र आहे ना तो प्रत्येक तिथीला वेगळा दिसतो.
हो ना काहीजण म्हणतात तो शुक्ल पक्षातल्या द्वितीयेला अद्वितीय दिसतो …किंवा मग पौर्णिमेला बहुधा त्यातही कोजागिरीला! तो सहजच बोलून गेला
ती अजूनही चंद्राकडेच एकटक बघत होती…
नाही रे चंद्र सुंदर दिसतोय तो आज…आज म्हणजे शुक्ल पक्षातल्या चतुर्दशीला!
त्याला काही कळलेच नाही पण तोही चंद्राकडे बघत तिचे बोलणे ऐकत राहिला…
ती बोलतच होती…
बघ त्याला निरखून कमालीची अपूर्णता आहे त्याच्यात…उद्याच्या पौर्णिमेची ओढ लावणारी…
सीतेविना असणाऱ्या रामाची अपूर्णता…
सर्वपराक्रमी असूनही अनौरस म्हणून हिणवले जाणाऱ्या कर्णाची अपूर्णता…
चिरंजीव असूनही कपाळावरची भळभळती जखम घेऊन भिक्षा मागणाऱ्या अश्वत्थाम्याची अपूर्णता…
पूर्ण पुरुष असूनही अयशस्वी पिता ठरलेल्या अर्जुनाची अपूर्णता…
कृष्णावर जीवापाड प्रेम करूनही त्याची कधीच नसलेल्या राधेची अपूर्णता…